सावंतवाडी (प्रतिनिधी) : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर आज कोल्हापूर येथील युवक खोलदरीत कोसळला आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असताना तो पाय घसरून पडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित तरूणा समवेत आणखी चार मित्र होते. मात्र हा नेमका प्रकार कधी घडला?, कसा घडला? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कांडरकर यांनी दिली. घटनास्थळी आपली टीम पोचली असून त्या ठिकाणी दाट धुके तसेच मोबाईल रेंज नसल्यामुळे मदतकार्य किंवा माहिती घेण्यास अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबोली कावळेसाद दरीत पर्यटक कोसळला












