वैभववाडी (प्रतिनिधी) : ईरटीका गाडीतून राजरोसपणे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जट्टापा आप्पाशा वंदाले वय ४२ रा. कुमठे सोलापूर, व माळसिद्धप्पा परमेश्वर प्रघानियवर वय ३८ रा. विजापूर अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार २०० रुपयांची गोवा बनावाटीची दारू व सुमारे १० लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण १२ लाख ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री १२. १० वाजण्याच्या सुमारास वैभववाडी शहरातील संभाजी चौकात करण्यात आली.
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर वैभववाडी शहरातील संभाजी चौक येथे वैभववाडी पोलिसांचे पथक गस्तीवर होते. या दरम्यान तरेळेहुन गगनबावड्याच्या दिशेने ईरटीका कंपनीची गाडी सुसाट जात होती. पोलिसांनी या गाडीला हात दाखवून गाडी थांबवली. यावेळी गाडीचा चालक व त्याचा साथीदार गाडी सोडून पळत होते. त्यांना पोलिसांनी चपळाईने पकडले. गाडीची पाहणी केली असता गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स खच्याखच भरलेले होते. त्यांना वैभववाडी पोलीस ठाणे येथे आणून पंचनामा करून सुमारे दोन लाख तीस हजार दोनशे रुपयांची दारू व सुमारे दहा हजार रुपयांची गाडी असा सुमारे बारा लाख तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर त्यांच्यावर गैर कायदा बिगर परवाना दारूची वाहतूक केलेल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस राहुल तळसकर, हरीश जायभाय, अजय बिलपे,अजित पडवळ, गणेश भोर,सागर मासाळ, संतोष माने,दीपेश कानसे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केली.












