शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी घेतली मंत्री भारत गोगावले यांची सदिच्छा भेट

खारेपाटण शुक नदीवर खार भूमी बंधारा बांधण्याची केली मागणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव व खारेपाटण ग्रा.पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन तथा खार भूमी विभाग मंत्री भारत गोगावले यांची सदिच्छा भेट घेत खारेपाटण शुक नदीतील गाळ उपसा करून खार भूमी बंधारा बांधून देण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली. मंत्री भारत गोगावले हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांची शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव व खारेपाटण ग्रा.पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, विधासभा प्रमुख संदेश पटेल, देवगड तालुका प्रमुख अमोल लोके व नगराध्यक्ष साक्षी प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

विजयदुर्ग – वाघोटन खाडीला जाऊन मिळालेल्या खारेपाटण शुक नदीला दरवर्षी पूर येत असतो. तर खारेपाटण शहराला नेहमी पुराचा फटका बसत असतो. त्यामुळे येथील शेतकरी व व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पुराच्या पाण्याचा धोका कमी करून शेतकरी व व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खारेपाटण येथील शुकनदी पात्राला खार भूमी बंधारा बांधून पुराची तीव्रता कमी करण्याबाबत यावेळी मंत्री गोगावले यांचेशी चर्चा करण्यात आली व सदर मागणीचे लेखी निवेदन मंत्री गोगावले यांचेकडे सादर करण्यात आले.


error: Content is protected !!