शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, डॉ.सोमनाथ कदम, ऍड. विलास परब आदींची उपस्थिती
कणकवली (प्रतिनिधी) : कवी किशोर कदम लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जिल्हा शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी सायं.५ वा.कणकवली कॉलेज रोड, कंझुमर सोसायटी, फ्लोरेट डिझायनिंग कॉलेजच्या सभागृहात सदर ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, इतिहास अभ्यासक प्रा.डॉ.सोमनाथ कदम, नामवंत वकील तथा माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष ऍड. विलास परब, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम, दर्पण प्रबोधनीचे अध्यक्ष आनंद तांबे हेही उपस्थित राहणार आहेत.
पेक्षाने शिक्षक असलेल्या कवी किशोर कदम यांची उपक्रमशील शिक्षक अशी ओळख आहे. सतत विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक दृष्टीने सांस्कृतिक उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना डोळस दृष्टी दिली. याच पार्श्वभूमीवर श्री. कदम यांनी विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण व्हावी आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीलाही अधिक धार प्राप्त व्हावी या उद्देशाने त्यांनी ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ या शीर्षकाअंतर्गत निबंधमाला लेखनाचे पुस्तक शब्दबद्ध केले आहे. वकृत्व स्पर्धेमध्ये ठराविक विषयांवर वक्तृत्व सादर करून स्पर्धा जिंकल्या जातात. इथे मात्र श्री. कदम यांनी ज्या महापुरुषांनी आपला वेगळा इतिहास निर्माण केला तरीही त्यातील काही महापुरुष समाजातून दुर्लक्षित राहिले अशांवर लेखन करून आपली पुरोगामी दृष्टी विस्तारत नेली आहे. अशा लेखनामुळे विद्यार्थ्यांना आपला खरा इतिहास काय आहे हे कळू शकेल आणि त्यातून त्यांची सम्यक दृष्टी घडण्यास या लेखनातून मदत होईल हेच या निबंधमालेचे महत्त्वाचे मोल आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाशन सोहळ्याच्या संयोजक नेहा कदम आणि दिप्ती पेडणेकर यांनी केले आहे.