रेल्वे प्रवासात प्रवाशाचे पैसे चोरले | संशयित पोलिसांच्या ताब्यात

आरोपीकडून चोरीच्या रक्कमेसह आयफोन सह चार मोबाईल जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : ठाणेहून कणकवली च्या दिशेने 10 जुलै रोजी मेंगलोर एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या शंकर रामचंद्र तावडे ( वय 60 , रा. डोंबिवली ) यांच्या बॅगेतील पाकीट लंपास करून रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. नितीश राजू शेट्टी, ( वय वर्षे 31, सध्या रा. अंबरनाथ, मूळ उडपी, कर्नाटक ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शंकर रामचंद्र तावडे ( वय 60 , रा. डोंबिवली ) हे 10 जुलै रोजी मेंगलोर एक्सप्रेस ट्रेनने ठाणे ते कणकवली असा एस 1 या स्लीपर बोगीतून प्रवास करत होते. 11 जुलै रोजी सकाळी नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ येताच तावडे यांनी आपली बॅग चेक केली. तेव्हा बॅगेत ठेवलेले पैशांचे पाकीट चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजूच्या सीटवर बसलेल्या नितीश शेट्टी यानेच आपले पाकिट चोरल्याचा संशय आल्याने तावडे यांनी तशी माहिती रेल्वे कणकवली रेल्वे स्टेशनवर येताच सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कणकवली रेल्वे पोलीस बलाच्या पोलिसांना दिली. आरपीएफ च्या कर्मचाऱ्यांनी लागलीच नितीश शेट्टी याला ताब्यात घेत याची माहिती कणकवली पोलीस ठाण्यात कळवली. रेल्वेत चोरीची घटना समजताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकावर पाठवून संशयित नितीश शेट्टी याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. शेट्टी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण चोरी केल्याची कबुली देत चोरलेले साडेपाच हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. शेट्टी याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत आयफोन सारखा महागडा मोबाईल आणि अन्य आणखी तीन मोबाईल सापडून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केकी असता सदर आयफोन हा गहाळ झाल्याची तक्रार डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर आयफोन व अन्य मोबाईल नितीश याने चोरले असल्याची शक्यता असून यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.

error: Content is protected !!