प्रोजेक्ट सुरक्षा प्रसार समारंभात माता व बाल आरोग्य क्षेत्रातील समुदाय-आधारित यशस्वितेचा गौरव
भिवंडी व मालेगावातील ९२,००० हून अधिक महिलांना व बालकांना लाभ
खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रकल्प सुरक्षा मध्ये सर्व समाज घटकांच्या सहकार्याने चांगले काम होत आहे. आणि त्यामुळेच आज प्रकल्प सुरक्षा चे अभियान यशस्वी होत असल्याचे असे प्रतिपादन महिला व बालविकास विभाग उपायुक्त राहुल मोरे यांनी मालेगाव भिवंडी येथील महिला आणि बालकांच्या प्रोजेक्ट सुरक्षा कार्यक्रमात मुंबई येथील कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. विजयमाला माने,अतिरिक्त आयुक्त आयसिडिएस मुंबई,पालघर चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, कॉग्निझंट फौंडेशनच्या हेल्थ केअर प्रोग्राम हेड उषा रानी, सिसिडीटी च्या कार्यकारी विश्वस्त सुकन्या पोद्दार हे मान्यवर उपस्थित होते. कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT) व कॉग्निझंट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट सुरक्षा या उपक्रमाचा प्रसार समारंभ यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी आणि समुदायातील नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रोजेक्ट सुरक्षा अंतर्गत भिवंडी व मालेगाव या शहरी भागांतील गर्भवती महिला, स्तनदा माता व दोन वर्षांखालील बालके अशा सुमारे ९२९१२ लाभार्थीपर्यंत प्रकल्पाचे थेट लाभ पोहोचविण्यात आले. यामध्ये ११,७५५ उच्च-जोखीम गटातील गर्भवती व माता तर ४,२९२ उच्च-जोखीम बालके ओळखून त्यांना आवश्यक आरोग्य व पोषण सेवा पुरवण्यात आल्या.या उपक्रमाचा गाभा म्हणजे समुदायाचा सक्रिय सहभाग. प्रोजेक्ट सुरक्षा अंतर्गत जनजागृती, पोषण साक्षरता, आरोग्य सेवा उपलब्धता यावर भर देण्यात आला. स्थानिक सरकारी विभागांशी समन्वय साधून शाश्वतता सुनिश्चित करण्यात आली. या उपक्रमासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने थेट देखरेख व वेळेवर मदत पुरवली गेली. या समारंभात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले अनुभव आणि अभ्यास सादर केले. तसेच “शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा पोहोचवण्यावरील” उच्चस्तरीय परिसंवाद घेण्यात आला. आशा कार्यकर्त्या, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हृदयस्पर्शी अनुभवांनी उपस्थितांना प्रेरित केले.लॅविना फर्नांडिस यांनी प्रकल्पाचे सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सिसिडिटी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सुकन्या पोद्दार यांनी प्रोजेक्ट सुरक्षा सारख्या यशस्वी समुदाय-आधारित मॉडेल्सना सरकारी कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे सर्वांना आवाहन केले.












