भाजीमागे पारंपरिक वारसा, पोषणमूल्ये आणि स्वयंपूर्णतेचा संदेश दडलेला – अजित गोगटे

जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत रानभाजी प्रदर्शन व विक्री उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद 

देवगड (प्रतिनिधी) : आज आपण ज्या रानभाज्यांचे प्रदर्शन पाहत आहोत, त्या प्रत्येक भाजीमागे पारंपरिक वारसा, पोषणमूल्ये आणि स्वयंपूर्णतेचा संदेश दडलेला आहे. या भाज्या केवळ आपल्या मातीत उगम पावतातच नाहीत, तर त्या आरोग्यदायी जीवनशैलीचे प्रतीकदेखील आहेत.” असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी व्यक्त केले.

जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत रानभाजी प्रदर्शन व विक्री या अभिनव उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक सुनील जाधव,उपक्रम प्रमुख व विज्ञान शिक्षक सतीशकुमार कर्ले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रानभाज्या या केवळ चविष्ट नसून पोषणमूल्यांनी भरलेल्याही आहेत. याच ठेव्याचे संवर्धन, प्रचार, तसेच पर्यावरणस्नेही व पारंपरिक अन्नपद्धतीचा पुरस्कार करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गणित विषयातील खरेदी-विक्री, नफा-तोटा यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळवता आला. उपक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. सतीशकुमार कर्ले यांनी केले होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेषतः उपक्रम नियोजक सतीशकुमार कर्ले यांचे आभार व्यक्त केले. 

error: Content is protected !!