वैभववाडीत शिक्षक समितीच्या स्थापना दिन विविध उपक्रमांनी होणार साजरा

 रक्तदान शिबीर, फळवाटप आणि वृक्षारोपणासह समाजहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : “त्याग व सेवा तसेच न्यायाची चाड व अन्यायाची चीड” हे ब्रीदवाक्य अंगीकारत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६३ व्या स्थापना दिनानिमित्त वैभववाडी शाखेच्या वतीने दिनांक २० ते २२ जुलै २०२५ दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै हा शिक्षक समितीचा स्थापना दिन आहे. त्या निमित्ताने दि.२० जुलै रोजी, सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत वैभववाडी ग्रामीण रुग्णालय  येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचेही सहकार्य लाभणार आहे. या उपक्रमात शिक्षक, पालक, तरुण मंडळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच  रुग्णांना मानसिक व शारीरिक ऊर्जा देण्यासाठी २१ जुलै रोजी, उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना तर २२ जुलै रोजी, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय या औचित्यावर वृक्षारोपणही करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या सर्व उपक्रमांत सर्व शिक्षक बंधू भगिनी व नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा वैभववाडीचे अध्यक्ष विवेकानंद कडू, सचिव प्रफुल्ल जाधव, महिला सेल अध्यक्ष दिव्या भोसले, सचिव वेलांकणी गुरव, कार्याध्यक्ष संतोष भरडकर, कोषाध्यक्ष राजाराम कात्रे, शिक्षक नेते सुनील चव्हाण, सुरेंद्र साळुंखे, पतपेढी संचालक संतोष मोरे,  सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडीचे तालुकाध्यक्ष राजू पडवळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!