जिल्ह्यातील नवोदित वकिलांसाठी बार कौन्सिल तर्फे १६ एप्रिल रोजी कार्यशाळा

सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करणार मार्गदर्शन ; ऍड.संग्राम देसाई यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शन करण्याकरीता महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्यावतीने १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय व मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार असून या प्रांतातील नवोदित वकील वर्गाला सामाजिक राजकीय व घटनात्मक जबाबदारी बाबत मार्गदर्शन होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड.संग्राम देसाई यानी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल च्या वतीने गेल्या वर्षीपासून या जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले आहेत. या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जिल्ह्यातील वकील वर्गाच्या मार्गदर्शनासाठी आले आहेत. १६ एप्रिल रोजी होत असलेल्या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक हे उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद झाली. त्यावेळी एड. संग्राम देसाई बोलत होते. यावेळी एड. अमोल सामंत डिंगे, एड. विवेक मांडकुळकर, एड.यतीश खानोलकर, ऍड महेश शिंपूगडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सानप, मकरंद कर्णिक, आर एन लड्डा ,वाल्मीकी मिनीजीस, भरत देशपांडे हे न्यायमूर्ती व राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे हे खास उपस्थित राहणार आहेत. बार कौन्सिलच्या वतीने नवोदित वकिलांसाठी कंटिन्यू लिगल एड एज्युकेशन प्रोग्रॅम घेण्यात येतो. पुणे येथील वकील श्रीकांत कानेटकर यांनाही मार्गदर्शनासाठी प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. सीबीआय एनआयए व पोलीस दलाला सायबर इन्वेस्टीगेशन साठी मदत करणारे श्री कानिटकर सायबर विषयातील महत्त्वाचे मार्गदर्शन नवोदित वकिलांना करणार आहेत. असेही ऍड संग्राम देसाई यांनी यावेळी सांगितले .

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी नुकतेच क्रिमिनल व सिविल प्रॅक्टिस हॅन्डबिल प्रकाशित केले असून सन २०२२- २३ या काळात कार्यरत झालेल्या नवोदित वकिलानाही मोफत पुस्तिकेचे वितरण या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
जसा पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला तसाच वकील वर्गासाठी संरक्षण कायदा असावा व एडवोकेट वेल्फर फंड ची संकल्पना असून मुंबई येथील वकील वर्गांच्या मागणीनुसार भूखंड मिळावा याबाबतची चर्चा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी झाली असून या प्रश्नाकडेही या कार्यशाळेत लक्ष वेधले जाणार आहेत. अशी माहिती संग्राम देसाई यांनी दिली.

गोवा राज्यसह कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वकील वर्ग व महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष जयंत हरी भावे व बार कौन्सिलचे २४ सदस्य सिंधुदुर्गनगरी येथील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. असेही एड. संग्राम देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!