मोठी बातमी ! ठाकरे सेनेचे देवगड जामसंडे नगरपंचायत चे वॉर्ड 7 मधील नगरसेवक रोहन खेडेकर अपात्र

नगरसेवक पदाचा गैरवापर करत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी केले डिस्क्वालिफाय

माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी केली होती तक्रार

वॉर्ड नं 7 मध्ये पोटनिवडणूकीची दाट शक्यता

देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर अटळ

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देवगड जामसंडे नगरपंचायत मधील सत्ताधारी नगरसेवक रोहन खेडेकर याना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नगरसेवक पदावरून अपात्र केले आहे. रोहन खेडेकर यांच्या नगरसेवक पदावरून अपात्रतेचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 11 एप्रिल रोजी पारित केला आहे. त्यामुळे वॉर्ड नं 7 मध्ये पोटनिवडणूक लागण्याची दाट शक्यता असून नगरसेवक खेडेकर यांच्या अपात्रतेमुळे सध्या देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्ताधारी ठाकरे गटाचे 8 व भाजपचे 8 असे समसमान बलाबल झाले आहे. त्यामुळे पोट निवडणूक लागल्यास वॉर्ड नं 7 मध्ये भाजपा विजयासाठी कंबर कसून देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर घडवणार हे निश्चित आहे.रोहन खेडेकर याना गरसेवक पदावरून अपात्र ठरवण्याबाबत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी तक्रार दाखल केली होती. चांदोसकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून देवगड येथील सर्व्हे नं. 486 / 3 / 2 क / 5 या बिनशेती प्लॉटमध्ये भूखंड क्र 14 मध्ये अनधिकृत बांधकाम केल्याबाबत रोहन याना नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे 7 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार दाखल केली होती. याबाबत झालेल्या सुनावणीत सदर ची जमीन मिळकत ही नगरसेवक रोहन खेडेकर आणि त्यांचे बंधू उमेश खेडेकर यांच्या संयुक्त नावे असून नगरपंचायत प्रशासनाची बांधकाम परवानगी न घेता त्या जागेत नगरसेवक पदावर असतानाच रोहन व त्यांचे भाऊ उमेश यांनी बांधकाम केल्याचे नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरून सिद्ध झाले. नगरसेवक रोहन खेडेकर यांनी विवादीत जागेत अतिक्रमण करत बांधकाम केल्याबाबत नगरपंचायत अभियंता विशाल होडवडेकर व बिट निरीक्षक भास्कर राऊळ यांनी केलेला पंचनामा त्या अनुषंगाने नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नगरसेवक रोहन खेडेकर यांनी आपला भाऊ उमेश याच्यांसोबतीने सदर जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नगरसेवक पदावर असताना रोहन खेडेकर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करत नगरपंचायत अधिनियमांचा भंग करून अनधिकृत इमारत बांधली हे सिद्ध झाले. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमब1965 चे कलम 44 1 ( ई ) नुसार नगरसेवक पदावरून रोहन खेडेकर याना अपात्र ठरवत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढले आहेत. योगेश चांदोसकर यांच्या वतीने ऍड. आर.व्ही.रावराणे यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!