वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनवर जलद एक्सप्रेसना थांबा मिळावा तसेच आरक्षण खिडकी चालू करावी या प्रमुख मागण्यांसह रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. अन्यथा रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी यांच्यावतीने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. कोकण रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर, चिन्मय भंडारी, यांनी तालुक्यातील आचिर्णे व वैभववाडी रेल्वे स्थानकाची पाहणी करून येथील समस्या जाणून घेतल्या. वैभववाडी रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी अधिकाऱ्यांसमोर प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेशन वरील समस्यांचा पाढाच वाचला. प्रवाशांच्या पुढे अधिकारी निरुत्तर झाले. स्टेशनवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. मात्र या रेल्वे स्टेशनला कोकण रेल्वे प्रशासनाने नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली आहे. वैभववाडी रेल्वे स्टेशन हे वैभववाडी तालुक्यासह देवगड कणकवली व गगनबावडा तालुक्यातील काही गावांना सोयीचे रेल्वे स्टेशन करत असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. मात्र या रेल्वे स्टेशनवर फक्त चारच गाड्या थांबत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी या रेल्वे स्टेशनवर जलद एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच 16 डब्याची असलेली राज्यराणी एक्सप्रेस ही 24 डब्यांची करावी. तसेच वैभववाडी रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्यांना तिकिटासाठी कणकवली रेल्वे स्टेशनवर जावे लागत आहे यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय होत आहे. यासाठी पूर्वी प्रमाणे आरक्षण खिडकी सुरु करावी. तसेच रेल्वे स्टेशनवर निवारा शेड नसल्यामुळे पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवाशांची तारांबळ उडत आहे. रेल्वे स्टेशनंकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे, सर्व गणपती स्पेशल ट्रेनाना वैभववाडी स्थानकात थांबा द्याव्या. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही तर रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंगी आमच्यावर गुन्हा दाखल झाले तरी चालतील पण आता आम्ही गप्प बसणार नाही. कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे वैभववाडी अध्यक्ष किशोर जैतापकर, वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर, तेजस साळुंखे, अनंत नेवरेकर, राजेश पडवळ, रमेश नारकर, प्रकाश बोडेकर, श्रीधर साळुंखे, रघुनाथ कोकाटे पंडित रावराणे, सुरेश सावंत, संतोष राणे आदी उपस्थित होते.












