खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म उंची वाढविण्याची प्रवासी संघटनेची मागणी

कोकण रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामास दिरंगाई

रेल्वे स्टेशन पाहणी करण्याकरिता आलेल्या अधिकारी वर्गासमोर ग्रामस्थांनी वाचला समस्येचा पाढा

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले कोकण रेल्वेचे रेल्वे स्टेशन म्हणजे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन होय. मात्र सध्या हे रेल्वे स्टेशन विविध समस्यांच्या विळख्याने ग्रासलेले असून या स्टेशनला सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवासी वर्गाचे अक्षरशः हाल होत आहेत. याबाबत प्रवासी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅटफॉर्म उंचीकरण करण्याबाबत लेखी पत्र व्यवहार करण्यात आला असून रेल्वे प्लॅटफॉर्म मंजूरी मिळाल्याचे समजते. तरीदेखील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप व संताप आज खारेपाटण रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याकरिता आलेल्या कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी व्यक्त केला.

चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी संघटना यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज बुधवार दि. ३० जुलै, २०२५ रोजी दुपारी कोकण रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक अधिकारी मधुकर मातोंडकर, वरिष्ठ खंड अभियंता चिन्मय भंडारे, जी.पी. प्रकाश (वरिष्ठ अधिकारी), विभगिय सुपरवायजर व्ही. डी. सामंत खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनला आले होते. यांच्या समवेत स्टेशन मास्टर भूषण फाटक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी प्रवासी संघटनेचे जिल्हा समिती सदस्य संतोष राणे, सुरेश सावंत यांच्या समवेत खारेपाटण रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म उंचीकरण करण्याबरोबरच विविध समस्येचा अधिकाऱ्यांसमोर पाढाच वाचला.

यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, माजी सरपंच इस्माईल मुकादम, चिंचवली सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच अनिल पेडणेकर, खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर, खारेपाटण रेल्वे स्टेशन समन्वय समिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर, सामजिक कार्यकर्ते विजय देसाई, संतोष पाटणकर, खारेपाटण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, उपाध्यक्ष संतोष तुरळकर, नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे, मोसम ग्रा.पं.सदस्य पांडुरंग कोकरे, अरुण कर्ले, बबन तेली, चिंचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर, विवेक ब्रम्हदंडे, पन्हाळे येथील श्री. चव्हाण आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

खारेपाटण रेल्वे स्टेशन करीता आवश्यक बाबी :
१) प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे.
२) तुतारी, कोकण कन्या व मांडवी एक्स्प्रेस आदी गाड्या थांबविणे.
३) स्टेशनकडे जाणारा रस्ता चांगला बनविणे
४) स्टेशन परिसरात पुरेशा लाईटची व प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे.
५) रेल्वे प्रवाशांना संगणक आरक्षण खिडकी उपलब्ध करून देणे
६) हॉलिडे स्पेशल गाड्या खारेपाटण स्टेशनला थांबविणे
७) रेल्वे स्टेशन परिसरात अधिकृत रिक्षा स्टँड निर्माण करणे.

आदी प्रश्नांबाबत आज खारेपाटण रोड रेल्वे संघर्ष समिती तसेच खारेपाटण प्रवासी संघटना समन्वय समिती तसेच खारेपाटण ग्रामपंचायत व रिक्षा संघटना खारेपाटण यांच्या वतीने विविध मागण्यांचे लेखी निवेदन कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. तर सदर कामे गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर कामे वेळेत पूर्ण न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने प्रवासी समन्वय समितीच्या वतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर व प्रवासी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर यांच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आला.

error: Content is protected !!