फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट हवेलीनगरची मुलगी आणि अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग (फायरिंग) मध्ये पहिल्याच राऊंडमध्ये सुवर्णवेध घेणाऱ्या मनस्या फालेचा ज्ञाती बांधवांकडून हवेलीनगर-वाडीवरील दत्तमंदिरामध्ये जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. दत्तमंदिराचे विश्वस्त शंकर पाटील महाराज या उभयतांनी मनस्याचे औक्षण करून दत्त महाराजांच्या कृपेने मनस्याची पुढील वाटचाल यशस्वी होईल अशा शुभेच्छापर आशीर्वाद दिला.
मनस्याचे यश फोंडाघाटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, असा विश्वास व्यक्त करताना, तिचे मार्गदर्शक शिक्षक आर्या भोगले, श्री. लाड, अजिंक्य पोफळे, मुख्याध्यापक व संस्था, एनसीसी अधिकारी आणि आई-वडिलांसह आजीचे योगदान महत्त्वाचे आहे. मनस्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि परिश्रम यामुळे तिचा पुढील प्रवास सुद्धा सुखकर असेल अशा शुभेच्छा कुमार नाडकर्णी यांनी दिल्या. माधवी दळवी, पूजा पाटील, पूर्वा साटम, सौ. सुरवसे, सेजल हुंबे, सौ. रासम, सत्यवान सावंत तसेच उपसरपंच तन्वी मोदी आणि न्याती बंधू-भगिनींनी मनस्याचे औक्षण केले. आणि तोंड गोड केले. भेटवस्तू देऊन तिचे अभिनंदन केले. शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या भावनांना वाट करून आनंद व्यक्त केला.
सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन करताना, ज्येष्ठ नागरिक प्रदीप गोरुले यांनी मनस्याचे औक्षण केले आणि रुपये 5000 चा धनादेश जाहीर करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. धनगर समाजाची एक कष्टाळू, विनम्र मुलगी आज सुवर्णपदक विजेती ठरली याचा सार्थ अभिमान आणि आनंद समाज वस्तीवर ओसंडून वाहत होता. याआधी मनस्या व परिवाराने जागृत देवस्थान पाचोबा चे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

















