कणकवली (प्रतिनिधी): गोपुरी आश्रमाच्या संचालक, पंचशील महिला मंडळ मिठमुंबरी च्या अध्यक्ष, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांना सन २०१३-१४ या सालचा महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ जाहीर झाला असून लवकरच तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण व मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते दिला जाणार आहे. अर्पिता मुंबरकर या शालेय जीवनापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गागोदे खुर्द,ता.पेन, जिल्हा -रायगड येथील विनोबा भावे यांच्या आश्रमात काही काळ राहून समाजसेवेचे धडे घेतले. पुणे मावळ भागात कुष्ठरोग तंत्र म्हणून तंत्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९९२ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असून समाजात व्यसनमुक्ती व्हावी याकरिता सातत्याने कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर विविध स्वरूपाचे प्रबोधनाचे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने सन १८-१९ सालचा ‘राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित केले आहे. व्यसनमुक्तीच्या कार्याबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विशेषत: ग्रामीण भागातील महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय,मानसिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी त्या सक्रिय कार्यरत असतात.गोपुरी आश्रमाच्या समाजकार्यांच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही त्या कार्यरत आहेत.अर्पिता मुंबरकर यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष मेहनत घेतली घेऊन महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सहकार्य केले आहे. अशा या हरहून्नरी सामाजिक कार्यात सक्रिय कार्यरत असलेल्या कार्यकर्तीचा महाराष्ट्र शासनाने ‘जिल्हास्तरीय पुण्यश्लोक पहिल्यादेवी होळकर, जिल्हास्तरिय पुरस्कार देऊन सन्मान केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.