टोल माफी दिल्याशिवाय टोल नाका चालू करून दाखवाच

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला इशारा

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग वाशीयांना पूर्णपणे टोल माफी दिल्याशिवाय ओसरगाव येथील टोल नाका चालू करून दाखवाच. मुळात हा टोल नाका या ठिकाणाहून हलवा अशी आमची मागणी असून जोपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे. तरीही बळाचा वापर करून टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू असेही पिळणकर यावेळी म्हणाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला मुंबई गोवा महामार्गावरील टोल नाका सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर हे सुरुवातीपासूनच या टोल नाक्याबाबत आक्रमक आहेत. ओसरगाव येथील हा टोल नाका या ठिकाणावरून हटवावा आणि जिल्ह्याच्या सीमेवर न्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी सुरुवातीपासूनच लावून धरली आहे. दरम्यान आता हा टोल नाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर अनंत पिळणकर यांनी रस्त्यावर उतरत मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा दिला.यावेळी बोलताना म्हणालेत राजापूर मध्ये गतवर्षी टोल नाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यावेळी काही नेत्यांनी केवळ स्टंटबाजी करून लोकांची फसवणूक करण्याचे काम केले. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वपक्षीयांनी जनतेच्या बाजूने राहिले पाहिजे. तरीही टोल कंपनीला मदत करून कोणी जनतेशी गद्दारी करण्याचे काम केले तर त्या लोकप्रतिनिधीला येत्या सर्व निवडणुकीत जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे जनतेसोबत असून कोणत्याही परिस्थितीत टोल माफी मिळाल्याशिवाय हा टोल नाका सुरू करू दिला जाणार नाही असा इशारा यावेळी अनंत पिळणकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!