आयुक्त सूर्यवंशी यांनी नापणे येथील काचेचा पुल व धबधबा परिसराची केली पाहणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : काचेच्या पुलावरून नापणे धबधबा व नैसर्गिक सौंदर्य पाहणे हे अतिशय आनंददायी असा अनुभव आहे. मुख्य धबधब्याचे पर्यटकांना समोरून दर्शन होण्यासाठी सुरक्षितेची काळजी घेऊन काय करता येईल याबाबत विचार केला जाईल. तसेच येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.असे आश्वासन कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले.
मंगळवारी दुपारनंतर वैभववाडीत जोरदार पाऊस पडत होता. या भर पावसात आयुक्त सूर्यवंशी यांनी नापणे धबधबा येतील काचेच्या पुलाला व धबधबा परिसराची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, काचेच्या फुलावरून धबधबा व येथील निसर्ग सौंदर्य पाहणे हे अतिशय आनंददायी व सुंदर असा हा अनुभव आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक सुविधा यामध्ये टॉयलेट असेल, चेंजिंग रूम खाण्यापिण्याची व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी स्थानिक सरपंच व ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेतील. परिसरात खाजगी जागा आहे या जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी काही सेवा सुविधा देता येतील का याबाबत विचार करण्यात येत आहे. या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक येत आहेत या पर्यटकांना या भागातील स्थानिक बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ असतील किंवा इतर काही उत्पादने असतील ती या ठिकाणी विक्रीला ठेवता येऊ शकतील. या धबधब्यावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या भागाची माहिती देण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन याठिकाणी गाईड म्हणून ठेवता येण्यासारखे आहे. यातून या धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत राहील असेही सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांतधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. खेबूडकर, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नापणे सरपंच श्री. जैतापकर, त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार केला.












