कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल तालुका कणकवली यांच्यामार्फत चिपळूण तालुक्यातील खांदटपाली शाळांमध्ये रेनकोट वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप रघुनाथ चौकेकर यांच्या माध्यमातून आणि कै. राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ हे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी राम नार्वेकर, माजी सरपंच अजय महाडिक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. कोरोना कालावधीत संस्थेमार्फत आरोग्य विषयक अनेक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यावर्षी प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील पाच हजार विद्यार्थ्यांना हे रेनकोट वाटप होणार असून संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.












