अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून कर्नाटक राज्यात नेले पळवून

कणकवली पोलिसांनी दोन दिवसांत शीघ्र कारवाई करत घेतले ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शहरातील एका शाळेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून कर्नाटक राज्यात नेणाऱ्या आरोपी मल्लिकाअर्जुन चांनाप्पा सात्याळ याला कणकवली पोलिसांनी मलकापूर जिल्हा सांगली येथे पीडित मुलीसह ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रवींद्र पन्हाळे, हवालदार सुदेश तांबे, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव, यांच्यासह हवालदार पांडुरंग पांढरे, चालक कॉन्स्टेबल भूषण सुतार यांच्या पथकाने ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यापासून दोन दिवसांत 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता केली.

याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी मल्लिकाअर्जुन चांनाप्पा सात्याळ हा मूळ कर्नाटक राज्यातील असून तो कणकवली शहरातील पटवर्धन चौकात एका नातलग भाजी विक्रेत्याकडे भाजी दुकानात कामाला आहे. शहरातील एका हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून आरोपी मल्लिकाअर्जुन चांनाप्पा सात्याळ याने शिंदगी विजापूर कर्नाटक येथे आपल्या मूळ गावी मोटरसायकल वरून घेऊन पसार झाला. ती मुलगी शाळेत जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. याबाबत पीडितेच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुरुवार 7 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी पीएसआय पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर पाठवले होते. कणकवली पोलिसांच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने मोबाईल लोकेशन ट्रेस करत आरोपीचा पाठलाग केला. आपल्या शिंदगी गावी मुक्काम करून शुक्रवारी आरोपी मलकापूरच्या दिशेने क्रूझर गाडीतून पसार झाला.

मलकापूर येथे 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता कर्नाटक पासिंगची क्रूझर गाडी थांबलेली पाहून कणकवली पोलिसांच्या पथकाने अधिक चौकशी केली असता गाडीत आरोपी मल्लिकार्जुन सात्याळ हा अपहरण केलेल्या पीडित अल्पवयीन मुलीसह सापडून आला. तात्काळ दोघांनाही ताब्यात घेऊन कणकवली पोलीसांचे पथक कणकवली पोलीस ठाण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली असून 10 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीसमोर सादर करून पालकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे.

error: Content is protected !!