जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आणि युवा कार्यकर्ते राजीव परब यांचा दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत सहभाग

‘भारतामधील वृद्धत्व: उदयोन्मुख वास्तव आणि बदलती प्रतिसाद प्रणाली’ या विषयावर संपन्न झाली राष्ट्रीय परिषद

संकला फौंडेशन संस्थेमार्फत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार व वृद्ध, मनोरुग्ण, वंचित घटकासाठी कार्य करत असणाऱ्या जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आणि युवा कार्यकर्ते राजीव परब यांनी राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. ‘भारतातील वृद्धत्व: उदयोन्मुख वास्तव आणि बदलती प्रतिसाद प्रणाली’ या विषयावर परिषदेचे संकला फौंडेशनकडून आयोजन करण्यात आले होते.

आजच्या घडीला भारतातील वयोवृद्ध नागरिकांची संख्या सुमारे १४९ दशलक्ष (१५कोटी) असून ती एकूण लोकसंख्येच्या १०.५ % इतकी आहे. एका अंदाजानुसार २०५० साली जेष्ठांची संख्या ३४७ दशलक्ष होणार असून ती तेव्हा एकूण लोकसंख्येच्या २०.८ % इतकी असेल. लोकसंख्येच्या वाढीसोबत निर्माण होणाऱ्या नव्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांना समजून घेणे आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रश्नाची व्यापकता समजून घेण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजक संस्था संकला फौंडेशनसह केंद्र सरकारचे सामाजिक न्याय, आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याण, माहिती तंत्रज्ञान, सांख्यिकी आदी विभागांसह राष्ट्रीय मानवी हक्क आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा परिषदेच्या संयोजनात व परिषदेत सहभाग होता. दरम्यान या परिषदेसाठी जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते राजीव परब आणि किसन चौरे यांनी राष्ट्रीय परिषदेत झालेल्या परिचयाच्या आधारे राजधानीतील सुप्रसिध्द एम्स रुग्णालयातील नॅशनल सेंटर फॉर एजिंग या केंद्राला व जीवन आनंद संस्थेची मित्र संस्था होमलेस एम्पॉवरमेंट ट्रस्ट संचालित बेघरांसाठीच्या ‘रैन बसेरा’ निवारा केंद्रांना भेटी देऊन तेथील कामकाज समजून घेतले. यावेळी होमलेस एम्पाॅवरमेन्ट ट्रस्टचे अभिषेक बाजपेयी, मो.तन्वीर व एम्स मधील हेल्पएज इंडियाचे आरोग्य मित्र सुनिता बिबस, विकी मंडल यांचे उत्तम सहकार्य लाभले. तर प्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषद सहभागासाठी जीवन आनंद संस्थेचे संदिप परब, रामचंद्र अडसुळे, शैलेंद्र कदम, सचिन पडते, सुनिल शिंदे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर येथील जीवन आनंद संचलित संविता आश्रमातील संस्थेचे कार्यकर्ते विश्वस्त किसन चौरे व युवा कार्यकर्ते राजीव परब यांची दिल्ली येथील परिषदेसाठी निवड होऊन त्यांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!