वर्तमानपत्र हे केवळ माहिती देणारे नसून विविध कंगोऱ्यांचे प्रभावी माध्यम विनोदसिंह पाटील
फोंडाघाट महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त ‘स्वातंत्र्यलढा व पत्रकारिता’वर विशेष व्याख्यान!
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध वर्गातील गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या वतीने गोल्ड कार्ड देऊन गौरविण्यात आले.
यानंतर भक्ती पेंडूरकर या विद्यार्थिनीने “स्वातंत्र्यलढा आणि पत्रकारिता” या विषयावर मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य चळवळीतील वृत्तपत्रांच्या भूमिका व त्यांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात प्रा. विनोदसिंह पाटील यांनी भारतीय पत्रकारितेच्या इतिहासावर, तिच्या परिवर्तनशील प्रवासावर आणि स्वातंत्र्यलढ्यातील कार्यावर सखोल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “वर्तमानपत्र हे केवळ माहिती देणारे माध्यम नसून प्रबोधन, समाजातील समस्यांचे निराकरण, सामाजिक सुधारणा व राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरणादायी शक्ती आहे. स्वातंत्र्यलढ्यातील पत्रकारिता ही देशप्रेम, अहिंसा, समानता आणि मानवाधिकारांचे प्रभावी व्यासपीठ ठरली. पाटील यांनी ऐतिहासिक उदाहरणे देताना सांगितले की, लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून देशभक्तीची जाज्वल्य भावना पेटवली; महात्मा गांधी यांनी ‘यंग इंडिया’ व ‘हरिजन’ मधून अहिंसेचा संदेश जनमानसात पोहोचवला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मधून दलितांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली; तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्रातून मराठी पत्रकारितेची पायाभरणी केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, पत्रकारिता हा केवळ एक व्यवसाय नसून समाजाशी बांधिलकी जोपासणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी पत्रकारितेत करिअर करण्याचा गांभीर्याने विचार करावा आणि सोशल मीडियाचा वापर विवेकबुद्धीने करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या मोदी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजाराम पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.












