वैभववाडीत विक्रमी 230 मिमी पाऊस; जनजीवन विस्कळीत, तीन घरांचे नुकसान

मुसळधार पावसाने वैभववाडी ठप्प; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच असून तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीने करूळ, भुईबावडा, कुसूर येथील प्रत्येकी एका घराचे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासात वैभववाडी तालुक्यात तब्बल 230 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे तर आत्तापर्यंत तालुक्यात 2992 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील महत्त्वाचे असलेले करूळ व भुईबावडा घाट सुस्थितीत आहेत. मात्र गगनबावडा ते कळे दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यामुळे तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.

तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गेले चार-पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसाने करूळ येथील मोतीराम बाबू गोरखे यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. तर भुईबावडा येथील सखाराम बाबू कांबळे व कुसुर येथील शंकर वसंत चाचे यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभर संपूर्ण वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशा जोडपून काढले. शासनाकडून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्यामुळे विदयार्थ्यांना दिलासा मिळाला.

error: Content is protected !!