वाभवे वैभववाडी शहराच्या विकास आराखड्याला स्थानिकांचा तीव्र विरोध

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचा विकास आराखड्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी एलगार पुकारला आहे. वैभववाडी शहराचा विकास आराखडा आम्हांला मान्य नाही, तो रद्द करावा. स्थानिकांना विश्वासात घेऊन फेर आराखडा तयार करावा. अन्यथा नगरपंचायत रद्द करून पूर्वी प्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करावी, अशी मागणी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीकडे करण्यात आली.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचा विकास आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. याला नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या आराखडयाला विरोध करण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे नागरिकांची सभा घेण्यात आली. या सभेत या आराखड्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. आतापर्यंत 320 नागरिकांनी विकास आराखड्या बाबत हरकती घेतल्या आहेत. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, बांधकाम सभापती रणजित तावडे, संघर्ष समिती अध्यक्ष शिवाजी राणे, सचिव नाना तांबे, शांताराम रावराणे, सज्जनकाका रावराणे, जयेंद्र रावराणे, अशोक रावराणे, बाळा कदम, रत्नाकर कदम, प्रकाश माईणकर, संतोष माईणकर, तेजस आंबेकर, संतोष कुडाळकर, यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी विकास आराखड्याला जोरदार आक्षेप घेतला. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र तो करत असताना स्थानिकांवर अन्याय होता कामा नये. आमच्या शहराचा विकास करतांना आम्हांला विश्वासात घेतले पाहिजे. कोणताही अभ्यास न करता टेबलावर बसून हा आराखडा तयार केला आहे, असा आरोप नागरिकांनी केला. प्रत्यक्ष विकासासाठी लागणारी जमीन अल्प प्रमाणात लागत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी आरक्षित केल्यामुळे स्थानिकांवर, शेतकऱ्यांच्या शेतजमीचे मोठे नुकसान होत आहे. खेळाच्या मैदानासाठी दोन ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेले आहे हे कशासाठी असा सवाल करण्यात आला. वैभववाडी शहराची लोकसंख्या सुमारे 2500 इतकी असताना खेळाची मैदानी दोन कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. फोंडा-वैभववाडी राज्यमार्ग वैभववाडी शहरातून जातो. हा मार्ग 30 मिटरचा घेण्यात आला आहे. तर दत्तमंदिर ते कोंडवाडी रस्ता १८ मिटर चा धरण्यात आला आहे. त्यामुळे वैभववाडी शहरातील संपूर्ण बाजारपेठ उध्वस्त होत आहे. तर ग्रीन झोनसाठी तब्बल 57 टक्के जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे वैभववाडीच्या विकासाला खिळ बसणार आहे. वैभववाडी शहराचे एकूण क्षेत्रफळ कमी असल्यामुळे ते 25 टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाच्या शहरातील रस्त्यासाठी तब्बल 60 मिटर रस्ता आरक्षित करण्यात आला. याला सुद्धा नागरिकांचा विरोध आहे. हा विकास आराखडा रद्द करावा अन्यथा नगरपंचायत रद्द करून पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करावी व या संकटातून आम्हाला मुक्त करावे अशी निर्वाणीची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या सभेनंतर नगरपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढत नागरिकांनी निवेदन दिले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे म्हणाल्या, नुकत्याच झालेल्या सभेत या आराखड्याला नगरपंचायत बॉडीने पूर्णपणे विरोध करून तसा ठराव घेण्यात आलेला आहे आणि तो ठराव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तर उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे म्हणाले, हा विकास आराखडा हा अन्यायकारक असून याबाबत आम्ही पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन नगरपंचायतीने आराखडा तयार करावा. तो आराखडा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आपण करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!