निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभार रचना केली नसल्याचा आक्षेप
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायतीने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर स्थानिकांकडून हरकत नोंदवली गेली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रभागांची रचना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सुजित प्रकाश गावडे (गांगोवाडी, कणकवली) यांनी मुख्याधिकारी, नगरपंचायत कणकवली यांना दिलेल्या लेखी निवेदनात प्रभाग क्र. 10, 11, 12 व 13 मध्ये गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे.
विशेषतः —
- प्रभाग क्र. 11 मध्ये सोनुर्ली अपार्टमेंट ते उषा कन्स्ट्रक्शन संकुल मार्गे राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा भाग चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आला असल्याची हरकत घेण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्वांनुसार महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूंचे भाग एकत्र करता येत नाहीत, मात्र तसे करण्यात आले आहे.
- तळी आळी परिसराचा काही भाग प्रभाग 12 मध्ये आणि काही भाग प्रभाग 11 मध्ये विभागला गेला असून, हे नियमाविरोधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- नेहरूनगर भाग प्रभाग 13 मध्ये समाविष्ट केल्याबाबतही हरकत घेण्यात आली असून, तो मूळतः प्रभाग 11 मध्ये राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
या प्रभाग रचनेमुळे स्थानिकांच्या भौगोलिक व सामाजिक बांधणीचे विभाजन झाले असून, नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे सध्याची प्रभाग रचना रद्द करून मार्गदर्शक तत्वांनुसार सुधारित रचना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










