कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच मटका अड्ड्यावर थेट जाऊन कारवाई केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे मनसेतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा नितेश राणे यांनी इशारा दिला होता. मात्र पोलिस प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने स्वतः पालकमंत्र्यांनाच कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागला, ही खेदजनक बाब असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष शांताराम सादये यांनी म्हटले आहे.
सध्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींना अश्या गोष्टी कराव्या लागत असतील तर मग सामान्य जनतेचे काय? पालकमंत्री, सत्ताधारी गृहमंत्री ह्यांच्याच पक्षाचे मग हे अपयश नक्की कोणाचे? पालकमंत्र्यांचे की गृहमंत्र्यांचे? असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे. कणकवली तालुक्यात मटका जुगारासह अनेक अनैतिक धंदे राजरोस सुरु असल्याची माहिती असून, या संदर्भात मनसेने १७ जून, २०२५ रोजी कणकवली पोलीस ठाण्यात लेखी निवेदनही दिले होते. त्याचा पाठपुरावा शिष्टमंडळाने करूनही कारवाई झालेली नव्हती, असा आरोप मनसेने केला आहे.
पोलिस प्रशासन या बाबतीत कमी पडत असल्याचे स्पष्ट होत असून, सरकारचा धाक प्रशासनावर राहिलेला नाही, असे दिसते. निदान आतातरी पोलीस कारवाई करतील का, असा प्रश्नही सादये यांनी उपस्थित केला. ‘पोलिसांचे डोळे जर बंद असतील तर आम्ही अवैध धंद्यांची माहिती देऊ. मग रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागेल,’ असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी करण्यात येईल, असेही सादये यांनी स्पष्ट केले.










