कार्यकर्त्यांना आपलंसं वाटणार मैत्रीपूर्ण नेतृत्व

कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा बॉस अशी कोल्हापूर ची ओळख

कै. अजित उर्फ पिंटू विश्वास राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित् लोटाला जनसागर

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूरच्या सामाजिक आणि राजकीय परंपरेत शिवाजी पेठेने अनेक सेवाभावी व्यक्तिमत्त्वे घडविली आहेत. शिवाजी पेठेचा समाजकारण आणि राजकारणाचा मूळस्थायी स्वभाव जरी असला, तरी कार्यकर्त्यांना आपलंसं वाटणारं, कोल्हापूरच्या अनेक सामाजिक संस्थांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असलेलं नेतृत्व म्हणजे कै. अजित राऊत.

कै. अजित राऊत उर्फ बॉस यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सार्वजनिक कामातील मनात घर करून राहिलेल्या आठवणी.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2005 ते 2015, तसेच जवळपास 2020 पर्यंत नगरसेवक पदाच्या कार्यकाळात अनेक नागरी सुविधा बाबत स्वतः जातीने लक्ष घालून अनेक समाजउपयोगी कार्य केले. शिवाजी तरुण मंडळाच्या स्थापनेपासून ज्या दिग्गज ज्येष्ठ व्यक्तीने शिवजयंतीची सुरुवात केली, त्या अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या शिवजयंती उत्सवाचा प्रमुख भाग म्हणजे व्याख्यानमाला. मी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सर्व संचालकांच्या मार्गदर्शनातून व्याख्यानमाला उत्स्फूर्तपणे चालायच्या. या कार्यक्रमात पडद्याआडून अदृश्य शक्ती म्हणून नेहमी कार्यकर्त्यांच्या सोबत अजित राऊत ही व्यक्ती असायची. व्याख्यानमाला प्रबोधनात्मक कशी होईल याबाबत जर विधायक विचार मांडला, तर त्याला होकार देण्यात अजित राऊत पुढे असायचे.

कोल्हापूर टोल आंदोलन, कोल्हापूर जिल्हा व शहर पातळीवरील भव्य फुटबॉल स्पर्धा, रंकाळा संवर्धन व संरक्षणाबाबतचे उपक्रम, पूरस्थितीतील अनेक गरजू लोकांना सहकार्य, शिवकालीन प्राचीन युद्धकला जोपासणाऱ्या सामाजिक संस्था – अशा अनेक सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असणारी व्यक्ती म्हणजे बॉस. विधायक आणि वैचारिक काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीलाच ‘बॉस’ म्हणतात. म्हणूनच हे बॉस नाव रूढ झाले होते.

सार्वजनिक काम करताना मतभेद असणारे मंडळी होती. परंतु त्यांना विश्वासात घेऊन रंकाळा प्रदूषण टाळण्यासाठी महिन्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम तसेच गणेश विसर्जन कुंड यासारखी ठळक कामे आजही सामान्यांच्या लक्षात राहणारी आहेत. कोल्हापूरच्या नदी आणि तलाव स्वच्छतेसाठी आग्रही राहणारे अजित राऊत यांच्या पाणीप्रदूषण टाळण्याच्या कार्याची देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा आणि कौतुक केले होते.

कोल्हापुरातील तसेच शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, मंडळे, रंकाळा संवर्धन समिती सारख्या अनेक संस्थांच्या सामाजिक कार्यात मदतीचा हात अजित राऊत यांचा असायचा.

नेहमी मदतीचा हात देणाऱ्या निखळ मैत्रीच्या या व्यक्तिमत्त्वास शिवाजी तरुण मंडळ व पेठेतील सर्व तालीम संस्था व कार्यकर्त्यांच्या वतीने मनःपूर्वक आदरांजली!

error: Content is protected !!