वाहतूक कोंडी वर प्रभावी उपाय करिता फोंडा ग्रामपंचायतकडून कणकवली पोलीस निरीक्षक यांना आवाहन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : बुधवार तारीख २७ ऑगस्ट रोजी घरोघरी गणपतीचे आगमन होत आहे. गेले पंधरा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसातही सुरक्षित फोंडा – घाटमार्ग निर्धोक सुरू आहे. सोमवारपासून बाजारपेठेमध्ये नागरिक– चाकरमान खरेदीसाठी गर्दी करणार आहेत.त्यात उतारपेठ असल्याने, होलसेल व्यापाऱ्यांच्या दुकाना समोर माल उतरून घेण्यासाठी वाहनाची लगबग असेल. रिक्षा, टेम्पो, दुचाकी यावर कोणाचेही बंधन नसल्यामुळे, प्रत्येक दुकानाच्या समोर कशाही लावलेल्या असतील. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता नाकारता येत नाही.
याबद्दल आज दुकानदार, वाहन चालक यांनी दक्षता घेऊन रस्त्यावरील भाजी फळ विक्रेते, गाड्या पेठेच्या बाहेर पार्क करा व दुकानांचे रस्त्यावर अडथळा ठरणारे बोर्ड काढण्याच्या सूचना स्पीकरवरून ग्रामपंचायतकडून देण्यात आल्या आहेत.याकडे व्यापारी, वाहन चालक, होकर्स, फळ विक्रेते, भाजीविक्रेते किती गांभीर्याने लक्ष देतील, यावर पेठेतील वाहतूक कोंडी अवलंबून आहे …
त्यातच ग्रामपंचायत कडून सरपंच संजना आग्रे,पवन भोगले, प्राची धुरी, पवन भालेकर, पिंटू पटेल यांनी कणकवली चे प्रभारी पोलीस निरीक्षक सावंत यांची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे २५ ऑगस्ट चे ३ सप्टेंबर फोंडा बाजारपेठेतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत पूर्ण बंद ठेवून सहकार्य करावे.वाहतूक कोंडी जीवित हानी व गैरसोय टाळावी अशी विनंती केली आहे. यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन गणेशोत्सव काळात पाच होमगार्ड मार्फत वाहतुकीवर नियंत्रण ठेवू, असे आश्वासन दिले. मात्र व्यवसाय उदिम, प्रत्येकाने दुसऱ्याची गैरसोय होणार नाही अशी काळजी घेतल्यास, उत्सव यशस्वीरित्या पार पडेल,अशी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून व्यक्त होत आहे…










