‘आरती प्रेमाने तुजलाss ओवाळीन भावे ss’ तुळजाई प्रासा. भजन मंडळाची आरती प्रचंड लोकप्रिय!

कोसळधाऱ्या संततधारेत सुद्धा गणेशोत्सवात भजनांची धूम! मोबाईलच्या प्रकाशात उत्साह शिगेला

गेले चार दिवस सतत वीज खंडित होत असल्याने, चाकरमानी, व्यापारी आणि भजनी मंडळामध्ये संतापाची भावना

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश आगमनानंतर गेले तीन-चार दिवस भजन मंडळी घरोघरी आपली सेवा रुजू करण्यासाठी निमंत्रण घेणे चालू केले आहे. अनेक भजनी मंडळांना प्रत्येक रात्री किमान चार ते कमाल ८/१० भजनांच्या ऑर्डर्स नोंदणी झाल्या आहेत. त्यातील लोकप्रिय भजन मंडळामध्ये फोंडाघाट- कुळाची वाडी येथील ‘कुळदेव भजन प्रासादिक भजन’ मंडळाला सर्व घरातून पसंती मिळत आहे. या मंडळाच्या भजनांमध्ये पारंपारिक गण -अभंग- गजर- गौळण व लोकप्रिय गाण्यांच्या चालीवरील अभंग आणि शेवटी स्फुरणीय आरती “आरती प्रेमाने तुजला, ओवाळीन भावेss” सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पंचक्रोशीत तुफान वेगाने ही आरती सर्वांच्याच मुखी व्हायरल होत आहे.

या मंडळातील बुवा संजय लाड, मृदंगावर धाकू मेस्त्री व सिद्धेश लाड तर झांज कुणाल लाड सह लाड परिवारातील अरुण, मंगेश, श्रीराम, सर्वेश, गौरव, प्रसाद, रुद्र, वशिष्ठ, श्रवण, रोहन, नामदेव, अशोक, मंगेश, दिनेश यासह जेष्ठ रमेश (आप्पा) तसेच विजय नाईक, गणेश पेंडूरकर, कार्तिक सुतार हे एकसंघ साथ करीत असल्याने भजन सर्वांगसुंदर आणि लोकप्रिय होत आहे. यामध्ये युवाईचा सहभाग कौतुकास्पद दिसून येतो.

एकीकडे चाकरमानी, कोकणवासी आणि स्थानिक अबालवृद्ध महिला- पुरुषांचा आणि युवाईचा उदंड उत्साह दिसत असताना गेल्या चार दिवसात कोसळणारा धुवांधार पाऊस आणि दिवसातून सतत दहा-पंधरा वेळा लाईट खंडित होणे यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. उपकेंद्रातील बिघाड सुद्धा संबंधित लाईनमन आणि अधिकाऱ्यांच्या दिवसभर लक्षात येऊ शकत नाही, याचेच आश्चर्य आहे. त्यामुळे प्रसंगी मोबाईलच्या प्रकाशात उत्साहात भजने होत असून, त्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन संध्याकाळी आणि रात्री वीज खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि उत्सव उदंड उत्साहात आणि आनंदात संपन्न करावा, अशी अपेक्षा फोंडावासीय करताना दिसत आहेत.

error: Content is protected !!