राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेची मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील व राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन 2014 पासून बंद करण्यात आलेल्या दोन वेतन वाढ पूर्वीप्रमाणे चालू करण्याची मागणी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना याबाबत निवेदन देण्यात येत आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्र राज्यातील हिंगोली व सिंधुदुर्ग जिल्ह्याने केले आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली जाणार आहेत.
सन 2013 पूर्वी राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामांचा गौरव केला जात होता. सन 2013 नंतर वेतनवाढ देण्याचा निर्णय रद्द करून रोख रक्कम एक लाख रुपये दिले जात आहेत. पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ देण्यात याव्यात. तसेच 2014 पासून राज्य व केंद्र शासनाने पुरस्कारासाठी दिलेले रुपये एक लाख व ५0 हजार, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांकडून वसूल करून घ्यावेत आणि सन 2013 राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगाडे, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, कोकण विभाग प्रसिद्धीप्रमुख स्नेहलता राणे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक मंदार चोरगे, केंद्रप्रमुख विजय केळकर, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुहास रावराणे, जगदीश गोखटे, संदीप परब, बाळकृष्ण कोयंडे, प्रदीप मराठे आदी उपस्थित होते.










