एकेरी वाहतूक सुरू करण्यात पोलीस व ट्रॅफिक विभागाला यश !
प्रवासी पर्यटक, चाकरमानी यांना गैरसोयीचा सामना !
ग्रामपंचायत सदस्य पवन भालेकर चे कौतुक
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाटात गुरुवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास फोंडा ते कोल्हापूर कडे जाणारा १२ टायरचा चिरे घेऊन जाणारा ट्रक,तीव्र वळणावर एक्सेल तुटल्याने रस्त्याच्या मधोमध बंद पडला.त्याच दरम्यान कोल्हापूरहून फोंडा कडे येणारा दुसरा १२ टायरचा मोठा ट्रक, साईड देताना एक्सेल पिना तुटल्याने बंद पडला.त्या पाठोपाठ आणि एक ट्रक बंद पडलेल्या ट्रकच्या मागे बंद पडल्याने, वाहतूक दोन्ही बाजूने बंद झाली. वाहनांच्या दुतर्फा रांगाच रांगा लागल्या. सुमारे पहाटे साडेपाच पर्यंत वाहतूक बंद होती. घटना समजताच फोंडा पोलीस चेक पोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल गुहाडे व कॉन्स्टेबल सुनील निकम घटनास्थळी तातडीने रवाना झाले. तेथील हॉटेलमधील ग्रामपंचायत सदस्य पवन भालेकर यांचे जेसीबी द्वारे एका बाजूचा ट्रक साईडला करण्यात यश मिळाले. आणि एकतर्फी वाहतूक सुरू झाली. काळोख, धुके आणि पाऊस यामुळे काम करण्यात व्यत्यय येत होता. मात्र अथक प्रयत्नांती शेवटची गाडी बाजूला करून वाहतूक एका बाजूने सुरू झाली. यामध्ये सुमारे चार तास प्रवासी- पर्यटक- परतणारे चाकरमानी यांना अडचणीचा सामना करावा लागला. ट्राफिक पोलीस गवस, लाड, इंगळे यांनी देखील तातडीने धाव घेऊन आणि उपस्थित प्रवासांच्या मदतीने पवन भालेकर यांच्या जेसीबी द्वारे वाहतूक एकतर्फी करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर पाच तासानंतर वाहतूक कुर्मगतीने सुरू करण्यात यश मिळाले. गणेशोत्सवात फोंडा बाजारपेठेतील वाहतूक खंडीत होण्याचा खेळ-खंडोबा झाल्यानंतर, यानिमित्ताने ओव्हरलोड चिरे वाहतूक आणि खड्डेमय झालेला घाट रस्ता हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि निष्काळजी, हलगर्जीपणामुळे वाहतूकदार, प्रवासी, पर्यटक, चाकरमानी यांचे कडून तीव्र निषेध आणि संताप व्यक्त होत आहे.















