जीवन आनंद संस्थेच्या पूनम बुर्ये यांना लोकमत टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड – २०२५ प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्था ही रस्त्यावरील निराधार, वंचित बांधव व भगिनींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेली एक अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. तर गोव्यातील पर्रा व फोंडा येथे संस्थेचे आश्रम असून,अनेक गरजू व्यक्तींना येथे सुरक्षित, सन्मानाचे जीवन मिळत आहे. या संस्थेच्या कार्यात सुरूवातीपासून सक्रीय सहभाग असलेल्या संस्थेच्या विश्वस्त पूनम बुर्ये यांना नुकतेच लोकमत टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड – २०२५ ने सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

गोवा सरकार शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बार्देश तालुका येथे पूनम बुर्ये यांना लोकमतच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुनम बुर्ये या एक आदर्श शिक्षिका असून शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी
जीवन आनंद संस्थेतून शेकडो निराधार बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे दोन्ही आश्रम केवळ निवारा देणारी ठिकाणे न राहता, एक प्रेरणास्थान ठरत आहेत. जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त मंडळ, संस्था परिवारातील कार्यकर्ते आणि पूनम बुर्ये यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षांव होत आहे.

error: Content is protected !!