भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वाहतूक वळवली
वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरुवारी सकाळी करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. अजूनही मार्गावरील मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून उद्यापर्यंत हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इतरही काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात्सव तळेरे -गगनबावडा -कोल्हापूर महामार्ग १२ सप्टेंबर पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आल्याचे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. पर्यायी वाहतूक भुईबावडा व फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करूळ घाटात गगनबावड्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर यु आकाराच्या वळणावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला होता. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते परंतु मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय येत होता. त्यामुळे सादर वाहतूक गगनबावडा व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू होणार असल्याचे महामार्ग प्राधिकारणामार्फत कळविण्यात आले होते. मात्र घाटात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या असल्याने आणि काही ठिकाणी उभे तडे दिसून येत असल्याने सैल खडकांचे सैलीकरण करणे अत्यावश्यक आहे. सदर कामासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची टीम बोलाविण्यात आलेली असून सैलीकरण पूर्ण झाल्यास भविष्यात दरड कोसळण्याच्या घटनांपासून बचाव होऊ शकतो. परंतु त्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने १२ सप्टेंबर पर्यंत घाटमार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.












