महसूल कडून वाहनाच्या दंडासह किमान दीड लाख रुपयांचा होणार दंड
कणकवली (प्रतिनिधी) : वाळू वाहतुकीच्या परवान्याशिवाय चोरटी वाळू वाहतूक करताना कणकवली पोलिसांनी पकडलेल्या त्या डंपर वर पोलिसांच्या कारवाईनंतर आता महसूल विभागाकडूनही कारवाई करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतूकिविरोधात सापडलेल्या प्रतिब्रास वाळूच्या बाजारभावापेक्षा पाच ते सात पट रक्कम आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर एक लाख रुपये रक्कमेचा दंड अशी दंडात्मक कारवाई केली जाते.तसेच पुन्हा चोरटी वाळू वाहतूक करणार नसल्याबाबत तहसीलदारांसमक्ष प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागते . 4 सप्टेंबर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मागे पूढे नंबर प्लेट नसलेला डंपर कणकवली च्या दिशेने जाताना पोलीस गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे याना आढळून आला होता. पीएसआय नानचे यांनी सदर डंपर थांबवून चौकशी केली असता विनापरवाना वाळू वाहतूक करत असल्याचे दिसून आले होते. तसेच डंपर चे सिंधुदुर्ग आरटीओ कडे MH -07- AJ 6757 असे पासिंग असूनही डंपर च्या मागे आणि पुढे नंबर प्लेट शिवाय डंपर ने वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाळू चोरीचा आणि नंबर प्लेट शिवाय गाडी चालवल्याचा गुन्हा डंपर चालकावर कणकवली पोलीस ठाण्यात 5 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला आहे. तुर्तास सदर डंपर कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून ठेवण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतुकी विरोधात कारवाई ही महसूल विभागाकडून केली जाते.अवैध वाहतूक केलेल्या वाळूचे मोजमाप करणे, बाजारभावानुसार त्याची किंमत ठरवून त्यावर दंड आकारणे आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंड आकारणी करणे हा अधिकार तहसीलदार यांचा असतो. त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी कणकवली पोलिसांनी पकडलेल्या अवैध वाळू वाहतुक करणारा डंपर आणि त्यातील वाळू बाबतचा अहवाल कणकवली तहसीलदार यांना सोमवार 8 सप्टेंबर रोजी कळविण्यात येणार असल्याची माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी व सदर गुन्ह्याचे तपासीक अधिकारी पीएसआय राजेंद्र नानचे यांनी दिली. साहजिकच पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर महसूल खात्याच्या नियमानुसार अवैध वाळूवाहतुक केल्याबद्दल डंपर मालक अथवा चालकावर 1 लाख रुपये आणि जप्त केलेल्या वाळू साठ्यावर बाजारभावाच्या 5 ते 7 पटीत दंड आकारणी केली जाणार आहे. एकंदरीत अवैध वाळू वाहतूक करणे सदर डंपर चालक आणि मालकाला पोलीस खात्याकडून झालेल्या आणि महसूल विभागाकडून होणाऱ्या लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाई मुळे चांगलेच महागात पडणार आहे. याबाबत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी संवाद साधला असता कणकवली पोलिसांकडून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्याबाबतचा अहवाल तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाला नसून पोलिसांचा अहवाल आल्यावर तातडीने कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगितले.












