मेडिकल टुरिझमसाठी केंद्रीय मंत्री प्रभू यांनी पाठपुरावा करण्याची मागणी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात “ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण देशाच्या तुलनेत दुप्पट आहे, अशी खंत व्यक्त करीत येथे जनजागृती तसेच महिलांची प्राथमिक तपासणी होण्यासाठी जिल्ह्यातील २०० हुन अधिक आशाताईना रेडकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तपासणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ. विवेक रेडकर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात मेडिकल टुरिझमसाठी मोठा वाव आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पाठपुरावा करावा. त्याचबरोबर जिल्ह्यात फिजिओथेरपी सेंटर व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका ठेवावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. रेडकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रेडी येथे सुरू करण्यात आलेल्या “विसावा”, या, केंद्राचे शुभारंभ श्री. प्रभू यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात रेडकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आम्ही विसावा केंद्राच्या माध्यमातून म्हातारपणात अनेक लोकांना हक्काचा हात मिळावा, त्यांचे पालन पोषण चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत. रेडकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून यापूर्वी अनेक प्रकल्प राबविण्यात आले. या दिलासा सारखा प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे आणखी सामाजिक काम करून लोकांसाठी काहीतरी करायचे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे.













