गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या कारसह एकजण ताब्यात

एलसीबीची कसाल मध्ये कारवाई; ८ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या अवैध दारुसह भरलेली मारुती इको कारसह एका आरोपीला एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने ताब्यात घेत ८ लाख ४४ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महेंद्र सोने परब (वय ४० वर्षे, रा. परबवाडी कसाल) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई कुडाळ तालुक्यातील कसाल (परबवाडी) येथे १७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आरोपी महेंद्र परब विरोधात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आरोपी महेंद्र परब हा गोवा बनावटीची दारूविक्री कसाल येथे करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबी चे पथक आरोपी महेंद्र परब च्या पाळतीवर होते. १७ सप्टेंबर रोजी रात्री महेंद्र परब याने गोव्याहून दारू आणल्याची टीप मिळताच एलसीबी च्या पथकाने त्याच्या घरी रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी छापा मारला. तेव्हा मारुती इको कार क्रमांक (MH07 AS3926) मध्ये गोवा बनावटीची दारू भरलेली आढळून आली. ७ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या इको कारसह ९४ हजार ७३५ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली.

सदर कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, राणे, डिसोजा, जामदार, घोन्सालविस, पोलीस अंमलदार समजिसकर, महिला पोलीस अंमलदार सावंत यांनी केली.

error: Content is protected !!