जाणवलीतील ‘वादग्रस्त दत्तमूर्ती’ राहणार जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात

अंनिस चे विजय चौकेकर यांचा पाठपुरावा

कणकवली (प्रतिनिधी) : जाणवली येथे मधुकर रामचंद्र मोहिते यांच्या घराशेजारील पडवीत २०१८ मध्ये सापडलेली वादग्रस्त श्रीदत्ताची सुवर्णमूर्ती आता जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहे. भारतीय निखात निधी कायदा १८७८ अन्वये जिल्ह्यातील निखात निधीचे पालकत्व जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने सदर मूर्तीचा ताबा त्यांच्याकडे देण्याचे निर्देश पुरातत्व विभागाने नुकतेच दिले आहेत.

डिसेंबर २०१८ मध्ये आपल्या घराशेजारील पडवीत खोदाई करताना मधुकर मोहिते यांना साडेचार फूट खोदाईतून ही सुवर्णमूर्ती सापडली होती. मोहिते कुटुंबियांनी याची प्रशासनाला कल्पना न देता अंगणात प्रतिष्ठापना करून मंदिरात रूपांतर केले होते. त्यांनी मूर्ती सुमारे ८०० वर्षे जुनी असल्याचा दावा करण्यात आला. मूर्ती वजन काट्यावर ठेवली असता वजन शून्य दाखवते, अशा अफवाही पसरवल्या. मात्र माहिती अधिकारातून पुरातत्व खात्याने मूर्तीची पहाणी केलेलीच नाही, तसेच प्रशासनालाही याबाबत कळविलेले नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, जुलै महिन्यात मूर्ती चोरीला जाऊन पुन्हा त्याच ठिकाणी सापडली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सहाय्यक संचालक, पुरातत्व विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. मूर्ती खोदाईमध्ये साडे चार फुटावर सापडलेली असल्याने यावर प्रथम शासनाचा अधिकार राहतो, असे या पत्रात नमूद केले होते. या मागणीची दखल घेत पुरातत्व विभागीय कार्यालयचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना पत्र पाठवून मूर्ती मधुकर मोहिते यांच्या ताब्यात न ठेवता जिल्हा प्रशासनाकडे ठेवावी. पुरातत्वीय दृष्टिकोनातून पाहणी व सत्यता तपासणी होईपर्यंत मूर्ती कोणत्याही खाजगी ताब्यात न देता सुरक्षित ठेवावी, असे कळवले आहे. याची प्रत तहसिलदार कणकवली व पोलिस निरीक्षक कणकवली यांनाही देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अभाअंनिसचे विजय चौकेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन, सहाय्यक संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाही तातडीने व्हावी, अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!