अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : युवतीच्या विनयभंग प्रकरणी कलमठ गावातील गीतेश प्रदीप लोकरे याला कणकवली तालुका न्यायालयाने सुनावलेली 1 वर्ष सश्रम कारावास सह 2 हजार रुपये दंडाची सुनावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयानेही कायम केली आहे. गीतेश लोकरे याला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 4 जानेवारी, 2016 रोजी गीतेश लोकरे याने कणकवली कॉलेजच्या ग्राउंडवर युवतीला मिठी मारून तिचा विनयभंग करून पळून गेला होता. याबाबत गीतेश विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर यांनी केला होता. कणकवली येथील न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन आरोपी गीतेश याचा गुन्हा सिद्ध झाला होता. गीतेश लोकरे याला कणकवली न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. कणकवली न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गीतेश लोकरे याने जिल्हा न्यायालयात अपील केले होते. त्या अपिलाची सुनावणी होऊन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी आरोपी गीतेश याला कणकवली न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम केली. अपील सुनावणी वेळी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी गुन्ह्याचा घटनाक्रम, प्रतायक्षदर्शी साक्षीदार यांची सांगड घालून गीतेश लोकरे यांनी पीडित युवतीचा विनयभंग केल्याचे सिद्ध केले. सरकारी अतिरिक्त अभियोक्ता तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून गीतेश प्रदीप लोकरे याला कणकवली न्यायालयाने सुनावलेली शिक्षा न्यायाधीश डॉ देशपांडे यांनी कायम केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर लागलीच गीतेश लोकरे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी जिल्हा न्यायालयात केली.












