“बौद्ध समाज बांधवांनी सहकाराच्या माध्यमातून आपला उत्कर्ष करावा.” – अरविंद वळंजू
खारेपाटण (प्रतिनिधी) : “सभासदांनी संस्थेप्रती दाखलविलेला प्रचंड विश्वास यामुळेच अत्यल्प काळात तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग ही संस्था जिह्यात नावारूपास आली असून बौद्ध समाज बांधवांनी सहकाराच्या माध्यमातून आपला उत्कर्ष साधावा.” असे भावपूर्ण उदगार संस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू यांनी संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना काढले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग या सहकारी संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षेखाली आनंदी व चैतन्यपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या वार्षिक सभेला संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, संचालक – मोहन जाधव, भास्कर जाधव, रमेश कदम, मिलिंद जाधव, संचालिका रुपाली पेंडुरकर, श्रध्दा कदम, संचालक मिलिंद सर्पे, कृष्ण कदम, सिद्धार्थ कदम, कांता जाधव, प्रमोद कासले, संस्थेचे सचिव व कार्यलक्षी संचालक सुनील कदम आदी मान्यवर संचालकांसह सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी डी. के. पडेलकर, प. पू. भालचंद्र महाराज नागरी सह. पतसंस्था मर्या. खारेपाटण या संस्थेचे संचालक व पत्रकार संतोष पाटणकर, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक श्री. पेंडुरकर आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे सचिव सुनील कदम यांनी सभेला उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करून सभेला रीतसर सुरवात केली. यावेळी संस्थेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संचालक व सभासदांचा संस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेने अल्पावधीत पहिला वार्षिक अहवाल काढून उत्कर्ष कामकाज करून सभासदांचा विश्वास संपादन केल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाचे अभिनंदनयुक्त ठराव डी. के. पडेलकर यांनी मांडला व काही सूचना देखील संचालक मंडळाला केल्या.
हि संस्था आपली आहे ही भावना मनात रुजवून सभादानी जास्तीत जास्त ठेवी संस्थेत ठेऊन संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन करून भविष्यात संस्थेला संगणक प्रणालीशी जोडून या सभासदांना आधुनिक तांत्रिक चांगल्या सुविधा देण्याचा संस्थेचा मनोदय असल्याचे देखील यावेळी अध्यक्षीय भाषणांत संस्थेचे चेअरमन अरविंद वळंजू यांनी सांगितले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, संचालक भास्कर जाधव यांनी देखील सभासदांना मार्गदर्शन केले. या सभेला मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील सभासद उपस्थित होते. तर वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संस्थेचे संचालक मोहन जाधव यांनी केले तर आभार संस्थेच्या संचालिका श्रध्दा कदम यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने वार्षिक सभेची सांगता करण्यात आली.












