फोंडाघाट तंटामुक्ती अध्यक्षपदी संतोष टक्के यांची एकमताने निवड

न्यायदानाची गरिमा राखण्याची संतोष टक्के यांचेकडून ग्वाही

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या फोंडाघाट ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत ग्राम तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संतोष राजाराम टक्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष सुंदर पारकर यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने टक्के यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. यावेळी सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, पिंटू पटेल आणि उपस्थित सदस्य व ग्रामस्थांनी टक्के यांचे अभिनंदन करताना योग्य, कठोर, सक्षम आणि पारदर्शक न्यायदानासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

संतोष टक्के यांनी यापूर्वी गावच्या विकासात्मक कामात, चर्चेत आणि निर्णय प्रक्रियेत अभ्यासपूर्ण सहभाग घेतला आहे. कणकवली तालुका आय काँग्रेसचे उपाध्यक्ष, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि फोंडाघाट ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून त्यांना अभ्यासपूर्ण अनुभव आहे. भ्रष्टाचार – सूचना आणि प्रसंगी वाद-विवाद यामागे त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन उपयुक्त असते. त्यामुळे स्पष्टवादी तसेच पारदर्शी स्वभावाच्या संतोष टक्के यांचेकडून तंटामुक्ती न्यायदानात नि:पक्षपातीपणा स्पष्ट दिसून येईल, अशी अपेक्षा यावेळी फोंडावासीयांनी व्यक्त केली.

आपल्या निवडीबद्दल आभार मानताना, संतोष टक्के यांनी फोंडावासियांच्या निवडीला मी सतत न्याय देईन. त्यासाठी समितीचे सदस्य तसेच ग्रामपंचायत, महसूल, पोलीस, विभागाच्या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे. माझ्याकडून न्यायदानाचा सदैव आदर राखला जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली.

error: Content is protected !!