झुंझार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित नवरात्रोत्सव उत्सवाला शानदार सुरुवात

देवीच्या मूर्तीचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन

खारेपाटण (प्रतीनिधी) : खारेपाटण येथील झुंझार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव- २०२५ ची शानदार सुरुवात मंडळाच्या वतीने करण्यात आली असून यावेळी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य आगमन मिरवणूक काढून खारेपाटण बाजारपेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात भक्तीभावाने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

यावेळी झुंझार मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या देवीच्या भव्य आगमन मिरवणुकीत गावातील अबाल-वृद्ध, महिला-पुरुष व युवक-युवती यांसह असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. खारेपाटण एस. टी. बस स्थानक ते खारेपाटण शिवाजीपेठ अशी देवीची भव्य वाजत गाजत मिरवणूक मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी झुंझार मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवगर्जना ढोल पथक कणकवलीच्या चमूने देवीच्या आगमन मिरवणूक सोहळ्यात दिमाखदार ढोल वादन करून नागरिक भाविकांची मने जिंकली.

झुंझार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव हा दि. २२ सप्टेंबर, २०२५ ते दि. २ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवाचे आकर्षण असलेला स्थानिक १०० महिलांचा सहभाग असलेला शिवराज्यभिषेक सोहळा संस्कृतिक कार्यक्रम दि. १ ऑक्टोबर, २०२५ खारेपाटण एस. टी. बस स्थानक येथे रात्री ११ वाजता सादर होणार आहे.

याबरोबरच दि. २७ सप्टेंबर, २०२५ ला भव्य ढोल वादन स्पर्धा तर दि. २८ सप्टेंबर, २०२५ ला रात्री ९.०० महिलांसाठी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. तसेच दि. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी भजनी मंडळाची भव्य भजन स्पर्धा होणार आहे. या सर्व स्पर्धांना रोख रकमेची मोठी बक्षिसे ठेवण्यात आली असून सर्व नागरिकांनी या उत्सवात या उत्सवानिमित आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी केले आहे.

error: Content is protected !!