मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ यांचे नाव व भव्य स्मारक उभारा

दैवज्ञ समाजन्नोत्ती परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दैवज्ञ समाजन्नोत्ती परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दैवज्ञ समाजाचे आराध्य दैवत नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे तसेच मुंबई मध्ये त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केले.

दैवज्ञ समाजोनत्ती परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे कारण पुढे करत मोर्चाला परवानगी नाकारली त्यामुळे दैवज्ञ समाजाच्या वतीने मोर्चा स्थगित करत आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी दैवज्ञ समाजोनती परिषद सिंधुदुर्ग चे अध्यक्ष डॉ विवेक रायकर ,काका कुडाळकर, श्रीपाद चोडणकर, उमेश नेरुरकर, दीपक बेलवलकर, मोहन तळगावकर, महेश कांदळगावकर, राजू पाटणकर, संजीव शिरोडकर, चंद्रकांत आचरेकर, संतोष कुडाळकर, आदींसह मोठ्या संख्येने दैवज्ञ समाज बांधव उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनातून त्यांनी नाना शंकर शेठ यांचे कार्य महान असून त्याना आधुनिक मुंबईचे जनक तसेच रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाते. नाना शंकर शेठ यांनी व्यापार, शिक्षण यासह विविध क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. भारतीय रेल्वेचे जनक, मुंबईचे आदय शिल्पकार, शिक्षण तपस्वी नाना शंकर शेठ यांच्या अथक प्रयत्नानंतर आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे अशी सुरू झाली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या दर्शनी भागावर त्यांचे कोरीव शिल्प तसेच सेंट्रल लायब्ररी येथे पूर्ण पुतळा उभारून इंग्रज सरकारने यथोचित सन्मान केला आहे. व्हिक्टोरिया टर्मिनसचे नामकरण नाना शंकर शेठ टर्मिनस करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर होऊन सुद्धा या टर्मिनसचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आले. परंतु आता मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ टर्मिनस असे नामकरण करावे. अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने २० मार्च २०२० रोजी सदर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. याला तीन वर्षे झाली.तरी अद्याप प्रस्ताव प्रलंबित आहे. तरी नाना शंकर शेठ यांचे कार्य लक्षात घेऊन मुंबई सेंट्रल टर्मिनस ला त्यांचे नाव द्यावे. तसेच मुंबईमध्ये त्यांचे भव्य स्मारक व्हावे. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!