सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील वाडोस मोरे गावात अवैध बंदूक कारखान्यावर कुडाळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अवैध बंदूक, जिवंत काडतुसे, बंदूक बनविण्याचे साहित्य, गवा सांबर या वन्यजीवांची शिकार करून त्यांची शिंगे बाळगल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले मुख्य आरोपी शांताराम दत्ताराम पांचाळ आणि आप्पा कृष्णा धुरी या दोघांचाही जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी फेटाळला. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आरोपींचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे. जामीन अर्ज सुनावणीवेळी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 2 ऑगस्ट 2025 रोजी कुडाळ पोलिसांनी शांताराम पांचाळ याच्या मोरे वाडोस येथील अवैध बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा मारला होता. या छाप्यात सांबर गवा रेड्याची शिकार करून कापण्यात आलेली शिंगे आढळली होती.तसेच अवैध बंदुका आणि बंदूक निर्मितीचे साहित्यसुद्धा सापडून आले होते. या गुन्ह्यात आरोपी शांताराम पांचाळ आणि आप्पा धुरी यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आरोपी शांताराम पांचाळ आणि आप्पा धुरी याना 2 ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शांताराम पांचाळ व आप्पा धुरी यांनी जिल्हा न्यायालयात जामिनावर मुक्तता होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाला जोरदार हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.आरोपिवर यापूर्वीही आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात एकूण 9 आरोपीना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, जामीन मिळाल्यास याकामी आरोपी पोलीस तपासात सहकार्य करणार नाहीत, अग्निशस्त्र निर्मिती आणि अग्निशस्त्र बनविण्यासाठी लागणारी घातक साहित्य जप्त करण्यात आले आहेत, आरोपी पुन्हा असा गुन्हा करू शकतात. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी आरोपी शांताराम पांचाळ आणि आप्पा धुरी यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.












