कणकवलीत हिंदी सक्तीविरोधात जनजागरण मोहिम

मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात सिंधुदुर्गात जनजागरण

कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता पहिलीपासून (तिसऱ्या भाषेच्या) हिंदी सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण मोहिम हाती घेतलेली आहे. या सक्तीच्याविरोधात लोकांना जागृत करणं आणि जनमत संघटन करणं, हा या दौऱ्याचा हेतू आहे. आतापर्यंत सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर इथे जाहिर सभा आणि पत्रकार परिषद घेऊन जनजागरण मोहिम केली आहे.

शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी कणकवली आणि रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी लांजा असा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात्त तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात जनजागरण मोहिमेअंतर्गत जाहीर कार्यक्रम आयोजित केले आहेत.

शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वा. गोपुरी आश्रम कार्यालय, कणकवली येथे एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे. सदर पत्रकार परिषदेला मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार, ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब उपस्थित राहणार आहेत.

तरी पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे, अशी विनंती आनंद भंडारे (९१६७१८१६६८) कार्यवाह, मराठी अभ्यास केंद्र कार्यवाह, शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांनी केली आहे.

error: Content is protected !!