वैभववाडी (प्रतिनिधी) : “सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे. मात्र या सत्तेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता कुठे दिसत नाही. सध्याच्या राजकारणात सत्तेपर्यत पोहचण्यासाठी युतीला पर्याय नाही. त्यामुळे सन्मान आणि सत्तेचा राजमार्ग दाखविणारी युती आम्ही शिवसेना (एकनाथ शिंदे) सोबत केली आहे. अन्य पक्षात राहून त्यांची हुजरेगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात या आणि युतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी व्हा”, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.
रिपब्लिकन सेनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आंबेडकर बोलत होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष अशोक कणगोलकर, प्रकाश करुळकर, मुंबई प्रदेश सरचिटणीस मिलिंद जाधव, महासचिव विनोद काळे, खजिनदार सुरेश मंचेकर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रदीप कांबळे, रमेश बावडेकर, अनिल तांबे, गोपाळ जाधव, गोवा प्रतिनिधी विकास गायकवाड, बाळकृष्ण जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आहे. मात्र इतर समाजाच्या तुलनेत एकूण लोकसंख्येच्या १०% असलेला समाज राजकीय सत्तेमध्ये कुठेच दिसत नाही. राजकीय दृष्ट्या आपण फार कमजोर आहोत. जे कोणी आहेत ते नाममात्र आहेत. सध्याचे देशातील राजकारण पाहता कोणत्याही एकट्या पक्षाला इलेक्शन लढवून जिंकणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे सगळीकडेच आपल्याला युती आघाड्यांचे राजकारण दिसत आहे. अन्याय अत्याचारा विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या युतीमध्ये सर्वांनी सहभागी व्हा. आपापसात लढत राहून आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षात या. स्वतःचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेऊन युतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी व्हा असे आवाहन करीत ही भूमिका समाजापर्यंत पोहोचवा असे सांगितले. या समाजाने चळवळ उभी करण्यासाठी प्रचंड त्याग केला आहे. त्या समाजाला सत्तेत सहभागी होण्यासाठी हा युतीचा निर्णय आम्ही घेतला आहे.
अनु जातीच्या आरक्षणात वर्गीकरणला विरोध
मातंग समाजाने अनुसूचित जातीच्या आरक्षणात वेगळे आरक्षण मागायला सुरुवात केली आहे. राज्य सरकार अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करून अनुसूचित जातीत समाविष्ट असलेल्या जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे. त्यामुळे अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करू नये हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सरकारच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
जात निहाय जनगणगनेची मागणी
देशामध्ये जात निहाय जनगणना होणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे निश्चित ठरवता येणार नाही. यासाठी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी आम्ही करत आहोत. राज्य सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करून आपली सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हे अत्यंत घातक आहे असेही ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.












