पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांची निवड

डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार उद्घाटन”

सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका नीरजा यांची निवड झाली आहे. तर संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार आहे. हे संमेलन येत्या २८ डिसेंबर रोजी आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी येथील कविवर्य केशवसुत सभामंडपात पार पडणार असून, संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत प्रा. प्रवीण बांदेकर यांनी ही घोषणा केली.

कवयित्री नीरजा यांच्या ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ असे काव्यसंग्रह तसेच ‘ओल हरवलेली माती’, ‘पावसात सूर्य शोधणारी माणसे’ हे कथासंग्रह व ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ ही कादंबरी विशेष गाजली आहे. त्यांना राज्य शासनासह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. तर उद्घाटक डॉ. लवटे यांचे ‘खाली जमीन वर आकाश’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध असून वि. स. खांडेकर स्मृती दालन उभारणीसह त्यांच्या लेखन संपादन कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. खांडेकरांचे ‘वैनतेय’ साप्ताहिकातील लेखन संपादित करून त्यांचे चार खंड त्यांनी प्रकाशित केले आहेत. याशिवाय, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाड्मयाचे दहा खंड त्यांनी संपादित केले आहेत.

यावेळी संमेलनाच्या विविध समित्या गठीत करून संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. या बैठकीस प्रा. प्रवीण बांदेकर, सतीश लळित, उषा परब, गोविंद काजरेकर, प्रसाद पावसकर, ऍड. संदिप निंबाळकर, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, सुमेधा धुरी, कल्पना बांदेकर, विजय ठाकर, वाय. पी. नाईक, मंजिरी मुंडले, विनया बाड, अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, विजय देसाई, राजू तावडे, रूपेश पाटील तसेच जिल्हाभरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!