वेंगुर्ले (प्रतिनिधी) : साहित्य प्रेरणा कट्टा, आजगाव यांच्या सलग साठाव्या मासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने व र. ग. खटखटे ग्रंथालय, शिरोडा यांच्या सहयोगाने रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता खटखटे ग्रंथालयात कोजागरी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होणारे हे कविसंमेलन सर्वांसाठी खुले असून, सहभागी होणाऱ्यांनी स्वरचित कविता सादर कराव्यात किंवा अन्य कवींच्या रचना सादर करताना मूळ कवीचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतगायन, नाट्यछटा, कथाकथन यांसारख्या कलाही सादर करण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली नावे शुक्रवार, ३ ऑक्टोबरपूर्वी ग्रंथालयात नोंदवावीत, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.












