दहावीत शिकणारा विद्यार्थी ठार, दोघे गंभीर जखमी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावर झाराप फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दहावीत शिकणारा राज पेडणेकर (साळगाव, नाईकवाडी) जागीच ठार झाला. तर त्याचे सहाध्यायी लवू पेडणेकर व सोहम परब हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता घडला.
आज सरस्वती पूजन करून हे तिघे विद्यार्थी मोपेडवरून जात असताना, मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात राज पेडणेकराचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.












