एक्साईज सिंधुदुर्ग भरारी पथकाची अवैध दारूवर मोठी कारवाई

दोन चारचाकींसह १६ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गांधी सप्ताहानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी कायद्याअंतर्गत सुरू केलेल्या विशेष मोहिमेत भरारी पथक सिंधुदुर्गने मोठी कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर कारवाई करत तब्बल १६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई आज, दि. ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सिंधुदुर्ग यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सावंतवाडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. या वेळी हुंडाई कंपनीची सिल्व्हर रंगाची सेन्ट्रो झिंग (क्र. एम.एच.१५/बी.एक्स.१५८०) व काळ्या रंगाची जीप कंपनीची कंपास (क्र. जी.ए.०३/वाय.१३६३) या वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान दोन्ही वाहनांतून गोवा बनावटी मद्याचे विविध ब्रँडचे ४५ बॉक्स मिळून आले, ज्यांची किंमत सुमारे रु. ४,२९,०००/- इतकी आहे.

मद्य वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन्ही वाहनांची किंमत रु. १२,००,०००/- असून एकूण रु. १६,२९,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दत्तात्रय भिमराव बंडगर (वय ५०, रा. संजयनगर, मिरज, जि. सांगली) व गजानन दिनकर पाटील (वय ४९, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) या दोघांविरुद्ध दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. ए. जाधव व दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांनी केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक व्ही. एन. कदम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एल. राणे तसेच जवान एस. एम. पाटील, पी. व्ही. भोसले, आर. आर. जानकर, के. टी. पाटील, आर. व्ही. शेटगे यांनी सहभाग घेतला. तसेच विटा विभागातील निरीक्षक आर. गुरव, दुय्यम निरीक्षक एस. पाटील व त्यांचा स्टाफ यांनीही सहकार्य केले.

सदर दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील हे करीत असून, विभागाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

error: Content is protected !!