दीपावलीच्या पूर्वसंध्येला, धुवांधार पावसात सुद्धा “गोकर्ण महाबळेश्वर” दशावतार उत्साही गर्दीत संपन्न !
कणकवली, देवगड, वैभववाडी कलाकार बहुउद्देशीय संघ. आयोजित नाट्याद्वारे स्व. प्रकाश मेस्त्री व स्व.राजू हरियाण यांना मानवंदना !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकणातील अनेक दंतकथा आणि लोककथा यामध्ये दशावतार सर्वार्थाने संपन्न ! यामध्येही माणुसकीचा झरा फोंडाघाट येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे दीपावलीच्या पूर्वसंध्येवर कणकवली- देवगड- वैभववाडी कलाकार बहुउद्देशीय संघ आयोजित, “रावण जन्म तथा गोकर्ण- महाबळेश्वर” या दशावतारी कथानकाच्या नाट्यप्रयोगातून दिसून आला. हा नाट्य प्रयोग नावाजलेले नाट्यकलाकार स्व. प्रशांत मेस्त्री आणि स्व. राजू हरयाण यांच्या आठवणी प्रित्यर्थ संस्थेने आयोजित केला होता. प्रयोगादरम्यान ढगफूटी सदृश्य धुवाधार पाऊस बरसत होता. मात्र प्रयोग एक तास उशिरा सुरू होऊनही प्रेक्षागृह तुडुंब भरून गेले.आणि कोकणची लोककला जनमान्य दशावतार व कलाकार जिंकले. कारण पाऊस थांबला आणि उशिरापर्यंत रसिकांनी मनमुराद आनंद लुटला…
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून, प्रयोगापूर्वी स्व. प्रशांत मेस्त्री आणि स्वर्गीय राजू हरयाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, आदरांजली वाहिली. मनोज रावराणे संतोष कानडे, तन्वी मोदी यांनी उभयतांच्या, दशावतारातील कलाकारीचे कौतुक करून दशावतार ही आपली कला आपणच जपली पाहिजे. ती जिवंत ठेवण्यासाठी आपण शासन दरबारी कार्यरत राहू. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी बबलू सावंत, बंडू पटेल, मिलिंद लाड, एकनाथ मेस्त्री, संतोष टक्के, आप्पा दळवी, लवु पुजारी,बाबू मेस्त्री, गिरीश लिंगरस,गौरी मेस्त्री, सुदर्शन फोपे नांचेसर, मारुती मेस्त्री, विजय पाटील, रुपेश पाटील, संतोष मिराशी, अभिमन्यू लाड इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत परुळेकर यांनी तर आभार प्रदर्शन अनंत तळेकर आणि फोंडाघाट दशावतारी कलाकारांनी केले..
सुमाली राक्षसाचा पुत्र विश्रवा आणि माता कैसवी यांना देवाच्या कृपाप्रसादाने आणि वरामुळे तीन मुले कुंभकर्ण, रावण, शूर्पंखा (राक्षस प्रवृत्तीची)आणि बिभीषण (देव प्रवृत्तीचे) झाले. रावणाने तपश्चर्याने शिवाचे आत्मलिंगच मागितले.यावर माता पार्वतीने गणेशाला गुराख्याचे रूप घेऊन, आत्मलिंग गोकर्ण – महाबळेश्वर येथे जमिनीवर ठेवण्यास भाग पाडले. आणि रावणाचा अपेक्षाभंग झाला. ही साधी, सरळ, सोपी, सर्वांना माहीत असलेली कथा ! तरीही ज्या सहजतेने, कंटाळवाणी न होता स्थानिक कलाकारांनी आपल्या दशावतारातू,अनुभव संपन्न अभिनयाने साकारली, ही बाब खरोखरच लाजवाब होती.. यामध्ये साहिल शिरोडकर, क्रिश गोसावी, गौरीश पांचाळ, सत्यवान चाळके, कृष्णा परब, गौरव शिंदे, दिलीप सामंत,प्रशांत कामतेकर,सुरेश गुरव, सुंदर तथा पपू साटम, रोहित राणे,अजित लाड, गुरुनाथ मेस्त्री, सुहास कानडे यांनी भूमिका साकारल्या. तर संगीत साथ अनंत तळेकर, संदीप मेस्त्री आणि नागेश शिरसाठ यांनी केली या नाट्यप्रयोगाला उदंड प्रतिसाद लाभला..












