रॅली, पथनाट्य व प्रदर्शनातून पोषण जनजागृती
वैभववाडी (प्रतिनिधी) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय वैभववाडी (बीट क्रमांक एक व दोन) यांच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत आठवा पोषण महा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते दत्त मंदिर अशी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात फलक व घोषवाक्ये घेऊन सहभागी महिलांनी “संतुलित आहार — निरोगी आयुष्याचा आधार” असा संदेश दिला. संभाजी चौकात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सादर केलेल्या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पथनाट्यातून संतुलित आहार, स्थानिक अन्नधान्य व पालेभाज्यांचे पोषणमूल्य याविषयी प्रभावी संदेश देण्यात आला. काही सेविका व मदतनीस फळभाज्या व पालेभाज्यांचे रूप धारण करून सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या आकर्षक वेशभूषेने आणि संवादातून पोषणाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या आवारात विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेल्या उपयुक्त वस्तू, शैक्षणिक साहित्य व गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मांडले. उपस्थित पाहुण्यांनी या कलाकृतींचे कौतुक केले. स्थानिक स्तरावर उपलब्ध धान्य, कडधान्य, फळे व पालेभाज्यांचा वापर करून तयार केलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांचेही प्रदर्शन लावण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या पदार्थांची चव घेऊन घरगुती व आरोग्यदायी पाककृतींचे कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमांतर्गत अंगणवाडीतील चार बालकांना चिकूची झाडे वाटप करण्यात आली. या प्रतीकात्मक उपक्रमातून मातृप्रेम, पर्यावरण आणि आरोग्य या तिन्ही मूल्यांचा संगम साधण्यात आला. या प्रसंगी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, वैभववाडी बीट क्र. १ व २ च्या पर्यवेक्षिका मनस्वी कांबळे, आरोग्य विस्तार अधिकारी सुप्रिया कांबळे, दोन्हीही बिटच्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी मान्यवर उपस्थित होत्या.












