संपर्क तुटल्याने मोबाइलधारक त्रस्त
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर मागील पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्याने गावातील जनसंपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. मोबाईलधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
साळशी गावात बीएसएनएलचा हा एकमेव मोबाईल टॉवर असून, तोच संपर्काचे प्रमुख साधन आहे. मात्र, टॉवर बंद असल्याने कॉल करणे, ऑनलाईन व्यवहार, विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास अशा सर्व सेवांवर परिणाम झाला आहे. मोबाईलमध्ये डाटा पॅक खरेदी करूनही इंटरनेट सेवा न चालल्याने ग्रामस्थांचे आर्थिक व्यवहार आणि संवाद दोन्ही ठप्प झाले आहेत.
कॉल न लागणे, कॉल कट होणे, इंटरनेटचा मंद वेग, आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करण्यात अडचणी या समस्या आता नेहमीच्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे, हा टॉवर वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. तसेच टॉवर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने तांत्रिक कामकाजात अडथळे येत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
साळशीतील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत “हा टॉवर तातडीने सुरू करून गावातील संपर्क व्यवस्था सुरळीत करावी,” अशी मागणी केली आहे.










